कॅन्सर (कर्करोग) म्हणजे काय?
  आपल्या शरीराची रचना अनेक छोट्या छोट्या पेशींपासून झाली अहे. नवीन पेशी तयार होणे व जुन्या पेशी नष्ट होणे हि शरीराची एक नियमित व नियंत्रित प्रक्रिया आहे. हि प्रक्रिया जेव्हा अनियंत्रित होते तेव्हा ट्युमर (गाठ) तयार होते. थोडक्यात ट्युमर म्हणजे शरीरात होणारी पेशींची अनियमित अनियंत्रित, कारणविरहित व भरमसाठ वाढ.

  ट्युमर दोन प्रकारचे असतात.
  १. हानिकारक व
  २. अहानिकारक.

  अहानिकारक ट्युमर शरीराच्या इतर भागात पसरत नाहीत. हानिकारक ट्युमर मधील पेशीमध्ये शरीराच्या एका भागातून दुसऱ्या भागामध्ये रक्तवाहिन्या व लिमफ्याटीक सिस्टीम मार्फत पसरण्याची क्षमता असते. ट्युमर पासून वेगळ्या झालेल्या पेशी शरीराच्या इतर भागात पसरून त्याठिकाणी नवीन वसाहती निर्माण करतात व शरीराच्या इतर भागात ट्युमर (मेटेस्टेसिस) होते. हे हानिकारक ट्युमर म्हणजेच "कॅन्सर - कर्करोग" होय.
कॅन्सरची कारणे :
  कॅन्सरची अनेक कारणे आहेत. परंतु मुख्यतः तंबाखूचे सेवन, सिगारेट, बिडी, गुटखा, दारू यामुळे होणार्या कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. या व्यतिरिक्त विविध रसायनांचे शरीरावर परिणाम, जंतूसंसर्ग एखाद्या भागाला पुन्हा पुन्हा होणारी जखम, शरीरातील हार्मोन्सचे अनियंत्रण, रेडीयेशन या कारणांमुळे कॅन्सर होतो.

  • रासायने
  • आहार आणि व्यायाम
  • संसर्ग
  • उत्सर्जित किरण
  • आनुवंशिकता
  • शरीरातील हार्मोन्सचे अनियंत्रण

कॅन्सरबद्दलचे गैरसमज व उपाय :
  सामान्यांपासून असामान्यांपर्यंत फक्त ज्याच्या नावाने हृदयात धडकी भरते असा रोग म्हणजे कॅन्सर. कॅन्सर म्हणजे असाध्य रोग अशी एक गैरसमजूत आहे. विज्ञानाच्या प्रगतीने व नवनवीन उपचार पद्धतीने आता कॅन्सर नक्कीच असाध्य राहिलेला नाही. कॅन्सरचे योग्य वेळी निदान झाले व त्याचे योग्य उपचार कॅन्सर तज्ञांकडून केले तर कॅन्सर पूर्ण बारा होण्याशी शक्यता जास्त असते

  साधारणपणे कॅन्सर बरे होण्याच्या चार अवस्था आहेत :
  अनु.क्र. अवस्था बरे होण्याचे प्रमाण
  १. प्रथम अवस्था ९० - १००%
  २. द्वितीय अवस्था ७० - ८०%
  ३. तृतीय अवस्था ४० - ६०%
  ४. चतुर्थ अवस्था ० - ५ % (खूप कमी)
  त्यामुळे लवकर निदान व योग्य उपचार आवश्यक आहेत. कॅन्सर संसर्गजन्य नाहि. काही थोड्या प्रकारचे कॅन्सर अनुवांशिक असतात. कॅन्सरची कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित इलाज करणे आवश्यक आहे.
उपचार :
  कॅन्सरच्या उपचारांच्या मुख्यतः तीन पद्धती आहेत.
  कॅन्सरची स्टेज, उपचारांची सुविधा, साईड ईफेक्ट व पेशंटचा शारीरिक फिटनेस लक्षात घेऊन डॉक्टर उपचार पद्धतीची निवड करतात.

किमोथेरपी

या उपचार पद्धतीत रक्तवाहिन्याद्वारे शरीरात औषधे देऊन पेशी नष्ट केल्या जातात.

शस्त्रक्रिया

या उपचार पद्धतीत शरीराचा कॅन्सर प्रभावित भाग शस्त्रक्रियेद्वारे शरीरातून काढून टाकला जातो. शस्त्रक्रिया हि कॅन्सरची एक उत्तम व प्रभावी उपचार पद्धती आहे.

रेडीओथेरपी

या उपचार पद्धतीत बाधित भागात रेडीयेशन किरणांद्वारे कॅन्सर पेशी नष्ट केल्या जातात.


कॅन्सर स्क्रिनींग :
  स्क्रीनींग म्हणजे कॅन्सरचे प्रथम अवस्थेत किंवा कॅन्सर होण्यापूर्वी (स्टेज ०) निदान करण्यासाठी करण्यात येणाऱ्या तपासण्या. या तपासण्याद्वारे कॅन्सरचे निदान झाल्यास कॅन्सर बारा होण्याचे प्रमाण जास्त असते. (साधारणतः ९५ ते १००%)
स्तन कॅन्सरच्या ऑपरेशन नंतर घ्यावयाची काळजी :
 • बाधित हातावर कोणतेही इंजेक्शन घेऊ नये.
 • बाधित हातातून तपासणीसाठी रक्त काढू नये.
 • बाधित हातातील नखे काढतांना सावधानगी बाळगा.
 • बाधित हातावर तंग कपडे व दागिने घालू नका.
 • खूप गरम व खूप थंड वस्तूंपासून बाधित हाताचे रक्षण करा.
कॅन्सरची लक्षणे :
  खालील पैकी कोणतेही लक्षण आढळल्यास कॅन्सर तज्ञांकडून त्वरित तपासणी करून घ्या. कारण यापैकी कोणतेही लक्षण हे कॅन्सरचे लक्षण असू शकते. कॅन्सरच्या उपचारानंतर कॅन्सर तज्ञाकडून नियमित तपासणी आवश्यक आहे. लवकर निदान व योग्य उपचाराने कॅन्सर बरा होतो .

  स्तन कॅन्सर
  • स्तनात गाठ येणे
  • स्तनातून रक्तस्त्राव होणे
  • स्तनाग्रास भेगा पडणे
  • काखेत गाठी येणे
  गर्भाशय कॅन्सर
  • रजोवृत्ती नंतर (पाळी थांबल्यावर) रक्तस्त्राव होणे
  • शारीरिक संबंधानंतर रक्तस्त्राव होणे
  • श्वेतपदर (White Discharge)
  मूत्र संस्था कॅन्सर
  • पाठीत दुखणे
  • लघवीतून रक्त येणे
  • लघवीला त्रास होणे
  • लघवीला जळजळ होणे
  • अंडाशय मोठे होणे
  • जननेन्द्रीयास न भरणारी जखम होणे अथवा गाठ येणे

  पचनसंस्था कॅन्सर
  • पोट फुगणे, पोटात पाणी भरणे
  • रक्ताची उलटी होणे
  • काळ्या रंगाची संडास होणे
  • पुन्हा पुन्हा उलट्या होणे
  • पोटात गोळा/गाठ येणे
  • कावीळ
  • संडास मधून रक्त पडणे
  श्वसनसंस्था कॅन्सर
  • खोकला येणे
  • वजन कमी होणे
  • थुंकित रक्त येणे
  • छातीत दुखणे
  तोंड, घसा व मान कॅन्सर
  • तोंडात न भरणारी जखम
  • आवाजात बदल होणे
  • थुंकीतून रक्त पडणे
  • नाकातून रक्त पडणे
  • श्वासास त्रास होणे
  • गलगंड
  • मानेत गाठी येणे
  • तोंडात पांढरया /तांबड्या रंगाचा चट्टा पडणे